बघतो.. शिक्षकांशी बोलून!!
आज मी एका आकाशला बदल स्वीकारताना आणि स्वतःला बदलताना अनुभवलंय, हो खरच.. सांगतो नेमके काय झाले ते.
एका प्रवाश्याला लिफ्ट देण्याच्या निमित्ताने का होईना पण त्याला सोडायचे म्हणून संविधान चौक, वानवडीत थांबलो. तेवढ्यात रस्त्याच्या बाजूला एक आई आणि तिचा मुलगा, गाडीच्या चाकाजवळील गार्डला कव्हर लावताना दिसले आणि माझ्याही गाडीला लावावे म्हणून बोललो. तिथे मी भेटलो आकाश आणि त्याच्या कष्टाळू आईला.
नेहमीच्या सवयीनुसार काम करताना मी त्याला त्याचे नाव विचारले? आणि लगेचच पुढचा सवाल केला 'शाळेत जातोस का?'. तो म्हणाला मला सर्व काही येते म्हणून शिक्षकांनी मला शाळेत घेतले नाही आणि मी देखील त्यांना परत विचारले नाही. हे बोलल्यावर मला समजले त्याला नक्की काय म्हणायचे होते ते पण तितक्यात तो म्हणाला 'माझ्या वयाच्या इतर मुलांना शाळेत जाताना बघितले की मलाही शाळेत जावे असे वाटते, पण नाही जात.'
बोलता बोलता मी लगेचच त्याला बोलून गेलो, 'एकदा जेवलो की भूक भागते का?' त्याचा चेहरा आश्चर्यचकित दिसला, कदाचित त्याला ते उदाहरण पटले असावे, म्हणून मी त्याला आणखी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, एकदा जेवलो की पुन्हा भूक लागतेच त्यामुळे एकदा शिकलो की भूक भागली असे नाही पुन्हा पुन्हा शिकावं लागतं. हे बोलून मी त्याला शाळेत जाण्यासाठी पुन्हा आठवण केली, त्यावेळी तो म्हणाला बघतो... शिक्षकांशी बोलून!!
या निमित्ताने तो पुन्हा शाळेची वाट धरेल असे वाटले म्हणून तिथून निघालो, निघताना त्याच्या आईने सांगितले, 'त्याला आईने कष्ट करताना बघवत नाही म्हणून मदत करायला येतो, बाकीच्या मुलांसारखे भटकत बसत नाही.' हे ऐकून आईच्या मदतीला थांबणार्या मुलाचे कौतुक वाटले. आणि एवढ्या परिस्थितीत देखील एकमेकांना मदत करणारी आई आणि मुलगा बघून खूप काही शिकयला मिळाले. त्या दोघांना अभिवादन म्हणून हा लेख.
Comments
Post a Comment