स्व-रूपदर्शन महाशिबिर सेवेकरी निर्माणाचा महायज्ञ


परिसरातल्या अणुरेणूतुन अविरत वेचुनी तेजाचे कण,
रसगंधाशी समरस होऊनि हृदयकमल फुलवावे, 
विकसित व्हावे अर्पित होऊनि जावे ।।

स्व. किशाभाऊ आणि त्यांच्या सवंगड्यांना वर्धिनीचा हा वटवृक्ष उभा करताना कधी पाहिले नव्हते, पण त्यांनी घडविलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या सहवासातून त्यांच्या संस्कारांची, सत्कार्याची आणि समर्पणाच्या ऊर्जेची प्रचिती नेहमीच अनुभवायला येत होती. निस्वार्थ निष्काम कर्मयोग या शब्दांचा प्रत्यक्ष अनुभव देणारे अनेक उपक्रम वर्धिनीच्या सहवासात होत असतात. त्यापैकीच आयुष्यातील अविस्मरणीय उपक्रम म्हणजे स्व-रूपदर्शन महाशिबिर, जिथे लहानांपासून वृध्द कोणत्याही पदाचा, विचाराचा, मनाचा भेद न बाळगता सह कुटुंब नांदत होती. या शिबिराचा महाशिबिर प्रमुख म्हणून काम करण्याची संधी वर्धिनी आणि देवाने दिली त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.

शिबिराविषयी सहवास, शिक्षण, संस्कार, सेवा, संघटन, समर्पण या आयामांमध्ये मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न.

 

सहवास

शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, 
शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी.

रयतेचा राजा असे प्रेरणादायी चरित्र प्रत्यक्ष जगण्यासाठी शिबिराची निवास आणि उभारणी रचना केंद्रस्थानी छ. शिवराय तेजस्वी सूर्य आणि सूर्यकिरणे पसरतात त्याप्रमाणे निवासाच्या राहुट्यांची आणि सभा मंडपाची रचना केली होती. सुरुवातील 150हून अधिक युवा कार्यकर्ते या शिबिर उभारणीला आले होते. अनेकांनी पहिल्यांदाच असा अनुभव घेतला होता. शिबिराच्या सुरुवातील तुळापूरहून शिबिरस्थानी मशाल फेरी काढण्यात आली आणि सर्वांनी एकत्रित शिववंदनेतून स्वराज्याची शपथ सर्वांनी घेतली. प्रत्येक सभामंडपात वर्धिनी भक्कम आणि बहुआयामी होण्यासाठी ज्यांनी सर्वस्व अर्पण केले अश्या सामन्यातील असामान्य व्यक्तींची माहिती फलके लावण्यात आली. त्याविषयी चर्चा आणि प्रश्नोत्तरे सत्रे घेण्यात आली. अनेक अनुभवांनी समृद्ध असलेल्या वरिष्ठ व्यावसायिक युवांशी शिबिरार्थींचा संवाद घडवून आणण्यात आला. अगदी मोठी भावंडे छोट्या भावंडांची काळजी घेतात त्याप्रमाणे सर्व गटशिक्षकांनी एकमेकांना आधार देत शिबिराचा सर्व दिनक्रम पाळला होता. प्रत्येक व्यवस्थेला अनुभवी वरिष्ठ युवा असल्याने त्यामधील सूक्ष्म नियोजन करून आवश्यक त्या रचना उभारणीस खूप मदत झाली.


संस्कार आणि शिक्षण

निर्मानोके के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, 
स्वार्थ साधना की आँधी में वसुधा का कल्याण न भूले 

शिबिरात अनेक मान्यवर व्यक्ती विद्यार्थ्यांशी संवाद चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आले. वयोगटानुसार त्यांची विभागणी केली होती. लहान गट (5वी ते 7वी), मोठा (8वी ते 12 वी), युवा गट (सर्व व्यावसायिक आणि वरिष्ठ युवा, सर्व प्रकल्प), युवती आणि महिला गट असे वेगवेगळ्या गटाने सर्व शिबिर चालू होते. प्रत्येकी 300+ संख्या असल्याने त्यांची स्वतंत्र व्याख्याने, चर्चा ठिकाणे उभी केली. अध्यक्ष मा. रघुनाथजी माशेलकर, उपाध्यक्ष मा. विवेक सावंत, श्री. अविनाश धर्माधिकारी, श्री. सुनील देवधर , श्री. सुहासराव हिरेमठ, श्री. मंदार आगाशे, डॉ. संगीता बर्वे, श्री. नागेश मोने, डॉ. राजीव तांबे , श्री. भालचंद्र पुरंदरे,श्री. राहुल कोकीळ, सौ. आभा भागवत, सौ. वैशाली देशपांडे, श्री. चंद्रशेखर देसाई, श्री. मारुती पडेकर या सर्वांची सत्रे, मार्गदर्शन पर व्याख्याने खूप छान झाली.

दुपारची सर्व कृतिसत्रे ही Cognitive-Analytical-Rational-Logical Thinking, समस्या सोडवणे, सामाजिक जबाबदारी तयार करणे, सर्जनशील विचार करणे, कृतज्ञतेचा सराव करणे आणि क्षमा मागणे याप्रकारची कौशल्ये आत्मसात करणारी होती.


सेवा, संघटन आणि समर्पण

सेवा है यज्ञ कुंड समिधा सम हम जले, 
ध्येय महा सागर में सरित रूप हम मिले

जरी शिबिर 3 दिवसांचे असले तरी याची तयारी मात्र 1 वर्षापूर्वीच सुरू झाली होती. दर महिन्याला विविध स्तरावर बैठका, क्षेत्रभेटी, स्थळांची आणि व्यवस्थांची विविध शिबिरांमधून तयारी, व्यवस्था आणि गटशिक्षकांची प्रशिक्षणे, शाखांवर विविध कार्यक्रमांना सहभागाचे आव्हान आणि बरेच काही चालू होते. यामध्ये अनेकांनी सेवा आणि समर्पण स्वरूपात योगदान दिले. शिबिरासाठी धान्य मोहीम केली असता अगदी काही दिवसातच सारे समर्पणातून जमा झाले. प्रत्येक व्यक्तीने आपला वेळ, तन, मन, धनाने आणि जमेल त्या समर्पित भावनेने केलेल्या योगदानामुळे हे शिबिर खूप छान झाले आहे. अनेकांचा उल्लेख करायला हा लेख अपुरा आहे पण त्यांची कृतज्ञता.

ध्येय भाव जो मनात येऊ दे तुझ्या कृतीत, 
कार्याची कीर्ती ध्वजा दूर देशी फडकू दे.
राष्ट्रन्नती एक मात्र ध्यान हेच चालू दे, 
राष्ट्र जीवनात जीव जीवनात पाहू दे.

किशाभाऊचे हे आवडते पद्य का असावे याचा प्रत्यक्ष अनुभव या शिबिराच्या रूपाने दिसत होता. प्रत्येकाला शिबिरातून मिळालेला अनुभव हा वर्धिनीच्या भावी काळाच्या उन्नती साठी नक्कीच सार्थकी ठरेन. संपूर्ण वर्धिनी परिवार एकत्र आल्यामुळे आपल्यालाच आपल्या शक्तीची ओळख होते आणि संघटनेच्या माध्यमातून जरी भिन्न कामे समाजात करत असलो तरी उद्देशाने अभिन्न आहोत याची जाणीव करून राष्ट्रन्नती चे ध्यान मात्र अविरत चालू राहील. प्रत्येक व्यक्ती विभाग त्यांच्या कार्यक्षेत्रात कीर्ती ध्वजा उभरेल यात शंका नाही. आम्ही मात्र या निमित्ताने खूप अनुभव आणि अविस्मरणीय क्षण साठवून पुढच्या अनेक शिबिरांना आणि उपक्रमांना सज्ज झालो. 

या शिबिराच्या पूर्णतेमध्ये प्रत्येक सहभागी विद्यार्थी, युवा, हितचिंतक, देणगीदार, सर्वांचे खूप योगदान मिळाले आहे त्या प्रत्येकाची कृतज्ञता आणि नेहमीप्रमाणे वर्धिनीच्या प्रार्थनेतील ओळीनी भगवंताला प्रार्थना करतो,

पुन्हा जन्म घेऊ, स्वराष्ट्रास ध्याऊ, प्रतिज्ञेस या तुचि साक्षी रहा ।
नमस्कार देवा तुला अमुचा हा, करी आमुची मायभूमी महा ।।




Comments

Popular posts from this blog

फायद्याचे बोला...।🙈🙉🙊

मॉडर्न चाणक्यनीती

शिक्षणाच्या आई-बाबा-चालक-मालकाचा घो...